कविता
मैत्रीण
असावी गोड मैत्रीण
बायको इतकी सुंदर
असली हुशार जरी
नसावी ती धुरंदर…
करावं तिने प्रेम कणभर
विसरेन बायकोला क्षणभर
पहाताच तिला समोर
ताकद येउदेत मणभर…
असेल ज्याला मैत्रीण
होइल तो शतायुषी
नसेल शुगर आसपास
नको बी.पी.गोळी उशाशी
मैत्रीणीशिवाय जगणं
हृदयाविना श्वास
गरज नाही कोणाची
सोड गड्या हा अट्टाहास
मैत्रीणीसोबत जगणं
प्रत्येक क्षण राधेचा भास
वाटते असावी ती सतत
श्वासासारखी आसपास
तिच्यासोबत गप्पा
किस्से सुध्दा तिच्याचवरी
लपुन पहाताना तिला
बायको नसावी शेजारी
प्रेयसी
प्रेयसी म्हणजे काय
ती तर दुधावरील साय
नाजुक जुइचं फुल तर
कधी कधी गरीब गाय
प्रेयसी म्हणजे काय
बहरलेला गुलमोहर
काटे न टोचणारा गुलाब
तर कधी रुसण्याचा कहर
प्रेयसी म्हणजे काय
सुंदर गुलाबी पहाट
रातराणीचा बहर
तर कधी राणीचा थाट
प्रेयसी म्हणजे काय
कृष्णाची बासरी
नवरसातील शृंगार
कधी इंद्रधनुष्य सप्तरंगी
प्रेयसी म्हणजे मिरा
प्रेयसी म्हणजे राधा
प्रेयसी म्हणजे श्वास
प्रेयसी म्हणजे भास
माहेर
आभाळ दाटुन येतं
सोबत कंठही दाटुन येतो
माहेरच्या आठवणीने
जीव कासावीस होतो….
माहेरवशीण येणार
सगळं गाव सजतं
आंबे ,फणस, काजु
मुठभर अंगावर मास चढतं..
वर्षभर आठवणीत
कसही निघुन जातं
एप्रिल महीना मात्र
पाऊल माहेरी पडतं
बाई होणं नाही सोपं
त्याहुनीही आई कठीण
माहेराच्या चाहुलीने
काळीज जातं तुटुन
कोरोना जा ना रे
जायचय आईच्या कुशीत
संसाराच्या रगाड्यात
चार दिवस जगु खुशीत
डेटींग
चाळीशीतही वाटतं
चोरुन करावं डेटींग
कधी wp वर चॅटिंग
तर कधी टपरीवर कटींग
कधी पावसात भिजणं
तर कधी थेटरमधे मुव्ही
कधी भाजलेलं कणीस
कधी असावीस तु जवळी
ओल्या केसात तुझ्या
माळावा मी हळुच गजरा
चिंब भिजवताना तुला
करावा व्हॅलेन्टाइन साजरा
बायकोच्या नकळत तुला
द्यावी गुलाबी साडी
गुपचुप भेटण्यासाठी तुला
बांधावी रूपेरी माडी
विमानातुन नेइन तुला
स्वित्झर्लंड पॅरिस
एका ताटात जेवु दोघे
भाकरी अन भरीत…
लय भारी
पाऊस आला
कवी जागा झाला
ऱ ला र .. ट ला ट
जोडु लागला….
वाचता वाचता
आली नाकी नव
कशासाठी ती सारी
शब्दांची जुळवाजुळव
माझ्यासारखे सारे
होतात रोमांचीत
कवी मात्र सापडतात
यमकाच्या कात्रीत
कोण सांगतं याना
नको तो उपद्व्याप
मस्त खावीत भजी
न देता डोक्याला ताप
ऐकावी कविता
बळजबरी यांची
त्यापेक्षा लय भारी
कविता आठवलेंची
निसर्ग आणि प्रेम
दोघात मारामारी
हेल काढुन गातात
कुठुन सुचते दुनियादारी
गप बसा रे बाबानो
पाऊस जाईल माघारी
आम्हा प्रेम युगुलांना
घेउदेत गगन भरारी
पाऊस
पावसाचे दुखले पोट
घे म्हटलं विस्कीचा घोट
रंगीत पाणी पाहुन मग
म्हणतो कसा सुटेल पोट
शेंगदाणे खाउन त्याचं
वाढलं कफ , पित्त
रंगीत पाण्याच्या नशेत
हरपलं त्याचं चित्त..
डोलवुन मान मग
ये म्हणाला कुशीत
पाहुन ओल्या साडीत
हसला झुबकेदार मिशीत
ओडत साडीचा शेव
पुटपुटला हळुच कानात
नको भिजुस इतकी
आजारी पडशील कोरोनात
पाहुन तुला मी
नेहमीच होतो वेडा
मनमुराद जगण्याचा
तुझ्याकडुन धडा घेतो
प्रियकर
मला नेहमीच आवडतं
त्याचं असं भरुन येणं
नेहमीच वेड लावतं
त्याचं ते निघुन जाणं..
मला नेहमीच आवडतं
इंद्रधनुत न्हाऊन निघणं
उन पावसाच्या खेळात
त्याचं ते मंत्रमुग्ध होणं..
मला नेहमीच आवडतं
समरस होवुन भिजणं
तो निघुन गेल्यावर
भिजलेले फोटो पहाणं..
मला नेहमीच आवडतं
त्याच्यावर कविता करणं
तु माठ आहेस म्हणत
त्यालाच पुन्हा मिस करणं..
मला नेहमीच आवडतं
त्याचं तिरकस बोलणं
आलेला राग लपवुन
त्याच्याशी प्रेमाने वागणं..
हाय काय नाय काय
कविता ळिहायला
कशापायी ओडातान
घे कागद पेण हातात
ळिहुन टाक दानदान
काय डोकं लागतय
हिकडचा शब्द तिकडं
कोन बघतोय ऱ्हस्व दिर्घ
ध्यान असुदेत यमकाकडं
येडया सोनलची कविता
कापी पेस्ट करुन टाक
ठोकायचं आपलच नाव
मराठीची तशीबी लागलेय वाट
कोनाला येळ हाय
शुध्द अशुद्ध पहाया
जो तो वाट पहातोय
वा वा मिळवाया
दर्जा काय असतु
आम्हास न्हाय ठाव
शब्द जुलवायला
कशाला हवाय भाव
ळाक्डाउनमंदी कवीला
सोन्या हिऱ्याचा भाव
स्पर्धेत भाग घ्यायळा
कावल्यांची काव काव
ळाइव पोग्रामचा पाऊस
समद्यानी पहावं माझ्याकडं
ठोक की रे ळाइक बाबा
णिसता बघु नको रुपाकडं