लेख - भाग १

असं कंटाळून कसं चालेल..

भांडी घासुन बायकोचं प्रेम मिळणार असेल आणि ती अधिकच रोमॅन्टिक होणार असेल तर कंटाळुन कसं चालेल…
 
पोळ्या लाटुन बबड्याची इमेज पुसली जाणार असेल ..आणि रस पोळी घाताना लाटुन हात दुखतोय म्हणुन  दोन पोळ्या कमी खाऊ असं वाटणार असेल
तर मग कंटाळुन  कसं चालेल..
 
प्रेमाने फरशीवर हात फिरवुन
तु माझी प्रेयसी सारखी आहेस मउ मउ असं म्हणुन पुसली ना तर ती अधिकच चमकेल…
मग इतक्यात कंटाळुन कसं चालेल..
 
अजुन चार दिवस बाकी आहेत
फक्त ८०च  दिवस झालेत..
आयुष्यभर धुणी धुते ती
चार दिवस कळ सोसलीस तर सुखाचे दिवस येतील…
तेव्हा कंटाळुन कसे चालेल…
 
नवीन नवीन डिश करुन खायला घाल
म्हातारपणी मुले पण काळजी घेतील .. जास्त विचार केलास तर ते दिवस लवकरच येतील..
आहे त्यात समाधानी रहा
तर असं कंटाळुन कसं चालेल…
 
रात्री बायकोचे पाय चेपलेस तर
तर तिच्या वटसावित्री व्रताला फळ येइल ८०च झालेत.. शंभरी गाठायचेय .
तर मग असं कंटाळुन कसं चालेल..
 
जोपर्यंत पोळ्या गोल होत नाहीत तोपर्यंत मित्रहो अशी हाक येणारच नाही आणि लॉकडाउन पण संपणार नाही..
तर मग अजिबात कंटाळुन चालणार नाही… 

अनुभवलेल्या चिंध्या

   “एक ना धड भाराभर चिंध्या “
अशाच अनेक चिंध्या अर्थात चांगल्याच.. काऱण संपूर्ण जगाने आज चिंधीचा उपयोग तोंड झाकायला केलाय.. कधीही कशाचाही उपयोग होवु शकतो आणि काय कधी क्लीक होइल सांगता येत नाही..
माझ्या आयुष्यतील अनेक चांगल्या चिंध्या कालच्या गाण्यानंतर उलगडत बसले होते.. या सगळ्या कलानी मला भरभरुन आनंद दिला आणि का जगावं हे शिकवलं..
    नटसम्राट नाटकाच्या विश्वविक्रमाने माझ्या आयुष्यतील मुकुटावर मानाचा तुरा खोवला..(मोठी चिंधी).. “झेंडा स्वाभिमानाचा ” या सिनेमाने ग्रामीण भूमिकेसाठी मला “बेस्ट ॲक्ट्रेस” ॲवॉर्ड दिला.. डिरेक्टर सरानी माझ्या डोक्यावर शेणाची टोपली दिली(भुमीकेचा भाग)त्याच भूमिकेने त्याच डोक्यावर मानाचा तुरा खोवला.. नाट्यरंजन या माझ्या ॲकॅडमीने मी शाळांपर्यंत पोचले.. राज्यनाट्य.. एकांकिका स्पर्धेने आत्मविश्वास देउन बेस्ट ॲक्टेस ॲवॉर्ड दिला..
     कवयित्री म्हणुन लोकांसमोर येताना शृंगार रसात लिहुन लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली.. शरदजी आणि रोहीतदादा .. मेघराज भोसले यांच्या हस्ते काव्य संग्रहाचं प्रकाशन केल्यावर रोहीतदादांकडुन माझ्या कविता ऐकतानाचा आनंद वेगळाच होता.. कारण राजकारण नसानसांत भिनलेलं असताना रोमॅन्टिक कविता वाचताना पाहुन त्यातील कोमल माणुस दिसला.. त्यानंतर गीतकार असा शब्द नावामागे लागताना अजुन एक चिंधी जमा झाल्याचं समाधान झालं.. दोन महीन्याने येणारी अजुन एक चिंधी कादंबरीच्या रुपात खुणावतेय.. लॉकडाउन नंतर A film by sonal Godbole .. अशी पाटी पहाण्याची स्वप्नं पडु लागलेत.. ती चिंधी लवकरच तुमच्या समोर येइल… सोशल वर्क ( अर्थात सोसल तेवढच) .. किवा अंध शाळेत शिक्षीका म्हणुन काम करतानाचा मिळणारा आनंद म्हणजे मला मिळालेलं ऑस्कर ॲवॉर्ड होतं.. ग्रॅज्युएशन नंतर असं काहीतरी वेगळे करण्याचा माझा मानस त्यांना माझ्या नजरेतुन दृष्टी देतानाचा आनंद ( करोडो रेशमी चिंध्या.. ).. अवर्णनीय.पुरूष हृदय वर खुसखुशीत लिहीताना तुम्ही दिलेलं प्रेम आणि माझ्यातील लेखकाला दिलेली(चिंधी) दाद.,सखुबाई सारखं एकपात्री करुन समोरच्यावर टोले लगावतानाचा घेतलेला आनंद तुम्ही प्रेक्षकांनी सुध्दा मनमुराद लुटुन हास्याच्या अनेक चिंध्या माझ्या पदरात दिल्या..ऱेडीओवर लाइव्ह प्रोग्रॅम करतानाचा अनुभव.. सेक्सरसाइज सारखा बोल्ड विषय हाताळताना माझी प्रतिमा अजुन उंचावत तुम्ही दिलेली प्रतिसादाची चिंधी .. जशा समोर आल्या तशा चिंध्या वेचत गेले.. त्यात आनंद घेतला आणि दिलाही.. या सगळ्या चिंध्या गोळा करताना एकटीची ओंजळ कशी पुरेल ना.. शक्यच नाही. अशा अनेक ओंजळीनी सदैव माझ्या भोवती पिंगा घातला आणि म्हणुनच हे शक्य झालय.. तुम्ही मंडळी सतत अशीच अवतीभवती रहावीत हीच अपेक्षा.. 

तरुण चाळीशी

माझं संपुर्ण लिखाण हे माझ्या नजरेतुन पुरुष कसा असेल .. कसा दिसेल.. कसा भासेल.. त्याच्या काय भावना असतील .. त्याला प्रेयसी , मैत्रीण, बायको कशी असावी वाटत असेल म्हणजेच मेल ओरिएंटल लिखाण असतं.. कारण अवतीभोवती प्रचंड पुरुषांचा गराडा असतो.. भाऊ.. नवरा.. बाबा.. सासरे.. मित्र असे असंख्य पुरुषांना पाहुन सतत खुप काही सुचत असतं.. बहीण नाही.. ननंद नाही.. मैत्रीणी कमी यामुळे स्त्रीच्या बाजुने कमी विचार केला गेला.. आज पहिल्यान्दाच स्त्रीला काय वाटतं , तिच्या मनातील प्रियकर कसा असेल हे लिहिणारेय.. स्त्री चा आदर करणारा, तिला या क्षणी काय हवय हे न सांगताही ओळखणारा.. तिच्या भावनांची कदर करणारा.. रांगडा.. मस्त पर्स्नॅलिटी .. हुशार .. काही गोष्टीवर फोकस्ड असणारा.. पोट आणि टक्कल अजिबात नसणारा.. सावळी कांती.. एवढी भली मोठी लिस्ट असताना तुम्ही म्हणताय स्त्री हृदय लिही सोनल.. झेपणारेय का हे सगळं .. नवऱ्याला विचारलं स्त्रीया फ्लर्ट कशा करतात तो म्हणतो तु मला कसं पटवलस तसच.. पडले ना तोंडावर.. आता काय लिहावं?..त्या आधी विश्वास पहात असाव्यात..स्त्रीच्या शरीराकडे न पहाता मनात डोकावणारा असावा.. कारण बाह्यसौंदर्य हे क्षणीक असतं.. त्याचे आचार विचार कसे आहेत हे पहात असाव्यात.. फिरायला नेणारा, खरेदीला नेणारा मारुतीच्या शेपटीसारखी वाढणारी लिस्ट आहे ही..

प्रियकर

स्त्रीया चाळीशीत अजुनच सुंदर दिसतात..  याचं कारण त्या वयात मुलं मोठी झालेली असतात .. स्वताकडे लक्ष द्यायला   भरपुर वेळ असतो..हळुच एखादा पांढरा केस डोकावायला लागलेला असतो.. नवीन दागिना चष्माच्या रुपात खुणावत असतो.. त्याला जवळ घ्यायला मन कचरत असतं पण डोळे त्याच्याकडे कटाक्ष टाकुन असतात.. केसांना वेगळेवेगळे रंग इंद्रधनु सारखे मुक्त विहरत असतात.. राहुन गेलेली कपड्यांची फॅशन पोट, कंबर वाढली तरी त्यावर त्या फॅशन ला कोंबणे ही कला जमायला लागलेली असते..वय विचारायचं कोणी धाडस करु नये आणि केलं तर अंटी मत कहो ना अशा रोमॅन्टिक वाक्यानी तुमची कर्णपटलं अजुनच सुमधुर संगीत ऐकल्याचा फील द्यायला लागतात.. आताही कोणीतरी चोरुन आपल्याकडे पहावं आणि आपली तारीफ करण्यासाठी चाललेली धडपड जेव्हा पन्नाशीतील व्यक्तीकडुन  होते तेव्हा तिच्या हृदयातील धडधड तिशीतील बोक्याने ऐकावी अशी काहींशी स्वप्न..इतक्यात शेजारचा छोटा मुलगा जेव्हा काकु म्हणुन हाक मारतो तेव्हा ते पहाटेचं स्वप्न नाही ना म्हणुन तिची चाललेली धडपड हे सगळं इतकं रोमॅन्टिक विशीतही घडत नाही .. त्यामुळे विशीतील पाऊस आणि चाळीशीतील पाऊस यात तीला चाळीतील पाऊस अधिक रोमांचित करतो.. ❤

आरसा

मी कशाला आरशात पाहु गं.. मीच माझ्या रुपाची राणी गं..आरसा आम्हा स्त्रीयांचा मित्र.. जितका वेळ आपण घरच्यांसोबत घालवतो किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेळ आपण आरशासोबत घालवतो.. मग तो काचेचा आरसा असो किवा मनाचा आरसा.. खऱ्या आरशात स्वतःची छबी दिसते पण मनाच्या आरशात त्या व्यक्तीचं संपुर्ण व्यक्तीमत्व दिसतं.. दोन्ही आरसे तितकेच महत्वाचे पण त्याहीपेक्षा अजुन एक आरसा आहे तो म्हणजे प्रेमाचा ज्यात आपण आपल्या व्यक्तीला न भेटता भेटु शकतो न बोलता बोलु शकतो.. याचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल..काचेच्या आरशात स्वतःला पाहु शकतो आणि प्रेमाच्या आरशात प्रिय व्यक्तीला. या lockdown काळात कीती तरी जणानी न भेटता आलं तरी भेटण्याचा हा अनुभव घेतला असेल… खंडेराय म्हाळसाशी दर्पणातुनच बोलायचे.. फोनशिवाय आरशातुन प्रिय व्यक्तीशी बोलतानाचा अनुभव कीती जणानी घेतलाय. तो देव होता पण प्रेम हे सगळ्याना सारखेच म्हणूनच म्हणतात ना तुमचे आमचे सेम असते..
        दर्पण म्हणजे तुच सख्या
        न दिसता आर्तव साद
        नको दृष्टी न लागे नजर
        न पहाता जीवघेणी हाक
नसेल कोणी हा अनुभव घेतला तर जरूर घेवुन पहा आणि दर्पणरुपी मित्राला धन्यवाद द्यायला विसरु नका..

प्रेमाची कॉफी

कॉफीचा मग हातात घेतला की तुझी आठवण आली नाही असं कधी होतच नाही आणि मग आठवतं ते आपलं कॉफीसाठी झालेलं भांडण.. मला  डाएटमुळे बिन साखरेची कॉफी आणि तुला दोन चमचे साखर घालुन गोड कॉफी.. मग त्यावर मी डाएट साठी दिलेलं भलंमोठं  लेक्चर जे तु मुकाट्याने प्रेमापोटी ऐकुन घेतोस पण अमलात मात्र आणत नाहीस.. हे सगळं मला माहीत असुनही मी काही बोलायची थांबत नाही.. कॉफीच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपलं भांडण सुरुच रहतं आणि म्हणुनच कॉफी बिनासाखरेची पण गोड लागते..
   अशा या रोमॅन्टिक वातावरणात मस्त पाऊस पडतोय आणि हातात कॉफी घेउन माझ्या झुल्यावर बसुन कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते.. आणि कॉफी पिता पिता माझी लेखणी पण सुरु होते… आणि त्याच्या आठवणीत लिहिता लिहीता माझी कॉफी पण गार होवुन जाते..
   गार झालेल्या कॉफीची फिकीर न करता माझी बोटं मोबाईलवर थिरकत रहातात आणि तु समोर नसतानाही समोर बसल्याचा भास होतो.. या कॉफीसोबत जर लतादिदीचे स्वर असतील तर मग तो पाऊसही थांबुन माझ्या लेखणीत आणि लतादि च्या स्वरात दंग होतो..माझ्या या पाउस मित्राला त्याच्या स्वागतासाठी ही रोमॅन्टिक लेखणी..❤